LANGUAGE MARATHI

लवचिकतेचे सामर्थ्य

<img decoding=
लवचिकतेचे सामर्थ्य

लहानपणी आई मला व मा‍झ्या भावाला ऑफिसला जाताना मा‍झ्या आजी कडे म्हणजे आईच्या आई कडे सोडून जात असे. आजीचे घर मोठे होते व त्याला भले मोठे अंगण होते, आजीने त्या अंगणात अनेक फुलझाडे लावली होती तसेच काही मोठे वृक्ष सुध्दा तेथे होते. एकदा पावसाळ्यात एका रात्री वादळ आले. जेव्हा दुसर्‍या दिवशी मी आजीकडे गेलो तेव्हा बघितले की झाडांच बरच नुकसान झाल आहे. काही मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या मात्र आश्चर्याची गोष्ट ही की लहान फुलझाडे मात्र व्यवस्थित उभी होती. मला त्याचे त्या वेळेस मोठे आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या वादळात जिथे मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्या तिथे ही लहानशी फुलझाडे मात्र कशी तग धरून उभी राहिली. मी  आजीला विचारले तेव्हा आजी म्हणाली, “ मोठी झाड ताठर आणि कडक होती म्हणून ती तुटली तर फुलझाडे ही त्यांच्यात लवचिकतेचे सामर्थ्य होती म्हणून ती टिकली, आणि वादळ संपल्यावर परत उभी राहिली.”

तो प्रसंग आजही मला आठवतो. मानवी जीवनाला यातुन किती शिकण्यासारखं आहे. त्या छोट्या फुलझाडांकडून त्यांच्या त्या लवचिकपणातून शिकण्यासारखं खूप आहे पुढे मला त्यांच्या त्या वाकण्याच्या क्रियेला ‘स्थितिस्थापकता’ हा शब्द मिळाला. ‘स्थितिस्थापकता’ म्हणजे कोणत्याही संकटानंतर लगेच पूर्वस्थितिला येणे. एखाद्या व्यक्तीच्या बाबत हा शब्द वापरला की त्याचा अर्थ होतो “ एखाद्या संकट काळात, निराशा, आघात, दु:ख यामुळे ताणलेल्या व्यक्तीच्या भावना तो प्रसंग संपल्यावर लगेच  पूर्व पदावर येणे म्हणजे त्या व्यक्तीची स्थितिस्थापकता.

तुम्हाला कधी कुणावर चिडून हात उचलावासा वाटला आहे ? आपल्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे अस वाटलं आहे ? मग अश्या अनुभवातून बाहेर पडून तुम्ही त्या अनुभवाबद्दल बोलू शकता आहात म्हणून देवाचे आभार माना.

त्या अनुभवाच्या काळात तुम्हाला संमिश्र भावनांचा अनुभव आला असेल. त्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणामही झाला असेल. सर्व बाजूने अंधारल्या सारखंही वाटलं असेल. तसेच त्या प्रसंगामुळे तुम्हाला मानसिक शीण आला असेल, आणि शारीरिक अस्वस्थता येऊन आजारपण आल्यासारखेही वाटलं असेल.

जीवन म्हणजे सुख दु:खाच मिश्रण असते. या पुढे कधी तुम्हाला दुःखद प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली, अगदी सगळं संपलं अस वाटेल तेव्हा खाली झुका, पण मोडू नका. ती परिस्थिती आपलं सगळं सत्व शोषून घेते अस वाटलं तर तिला तस करू देऊ नका.

या अश्या निराशावादी वातावरणातून सकारात्मक व आशावादी दृष्टीकोन तुम्हाला बाहेर काढेल. माझ्यात या प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य आहे व उद्याचा दिवस आजच्या पेक्षा अधिक चांगला असेल व उद्या काहीतरी चांगलं होईल अशी आशा मनात असली की, मग तो प्रसंग तेवढासा वाईट, दुःखद वाटणार नाही. ते नकोस वाटणार कामही तुम्ही सहजपणे करू शकाल. फक्त त्याचा शेवट हा चांगला होणार आहे याची खात्री तुम्हाला असायला हवी.

कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका. प्रसंग कितीही कठीण आणि निराशापूर्ण असला तरी स्वत:ला कोलमडू देऊ नका. त्या ऐवजी लवचिकचे सामर्थ्य किंवा स्थितिस्थापकता दाखवा. त्या फुलझाडांसारखे तात्पुरते वाका पण मोडून जाऊ नका.  

8 thoughts on “लवचिकतेचे सामर्थ्य

Comments are closed.

error: Content is protected !!